माजी प्रियकर (Ex Boyfriend)
.......हो बोलते मी माझ्या माजी प्रियकरासोबत. आवडतो मला त्याचा सहवास, त्याचं अस्तित्व. मला नाही जायचयं त्याच्यापासून लांब किंवा त्याला नाही जाऊ द्यायचंय माझ्या आयुष्यातून. नात्यामधले प्रेम संपले कि तो व्यक्तीदेखील आपल्यासाठी संपतो का? त्याचा इतका राग करायचाच का मुळात? तो मला सोडून गेला, तो आमचं नातं तोडून गेला, त्याने कधी मला समजून घेतलं नाही, त्याने माझा कधी विचार केला नाही. बस्स इतकचं कारण पुरेस आहे का एखाद्याला आपल्या आयुष्यातून काढून टाकायला? जेव्हा तो माझा मित्र होता तेव्हा पण तर मला माझं आयुष्य सुंदर वाटायचं, तो माझा प्रियकर झाला तेव्हा पण आयुष्य तसच होतं. मित्र असताना माझं आयुष्य त्याच्या भोवती फिरत होतं, प्रियकर झाला तेव्हा पण फिरत होतच ना. काळजी, प्रेम, आदर, आपुलकी इतकचं कशाला आम्ही माणसं पण तशीच होतो. काहीच बदललं नव्हतं आमच्यात. फक्त आमच्या नात्याचे नाव बदललं होत ज्यामुळे नकळत आमच्या एकमेकांकडून अपेक्षा देखील बदलत गेल्या. आता तो माझा बॉयफ्रेंड आहे आणि त्याने फक्त माझ्याकडे बघायचं अशी माझी अपेक्षा...