लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप



             लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप


         जसजसा काळ बदलत गेला तसतसे नात्यांची , प्रेमाची आणि मैत्रीची परिभाषादेखील बदलत गेली. आपण, आपले , आपल्यासाठी यावरून प्रत्येक नाते हे मी , माझे आणि माझ्यासाठी असे संकुचित होत गेले. मी न माझा राहिलो हे फारच क्वचित ठिकाणी अनुभवायला मिळू लागले. प्रेमामध्ये तर नवनवीन बदल घडतच राहिले. 'लिव्ह इन रिलेशनशिप' , 'समलैंगिक संबंध' , 'करियर ओरिएन्टेड प्रेमसंबंध'  या सर्व बदलांना उधाण आले. या सर्व प्रकारात 'लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप'  हा प्रकार मात्र अजरामर स्वरूपाचा झाला आहे. म्हणजे पूर्वीचा काळी लग्नानंतर नवरा कामानिमित्त मुंबईला आणि बायको गावी असा प्रकार सर्रास होत असे. काहींचे नवरे हे लष्करात कार्यरत असे त्यामुळे देशसेवेसाठी त्यांना सीमेवर आणि बायकांना घरी असा दुरावा तर सहन करावाच लागे. दोन वेग-वेगळ्या गावाचे प्रेमी जोडपे असल्यास एखाद्या लग्नात अथवा कोणत्या ना कोणत्या समारंभांमुळे एकमेकांच्या गावी जाणे होत होते. हि झाली काही पूर्वीच्या काळातील लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपची उदाहरणे. हा आता देखील काही ठिकाणी हि उदाहरणे लागू होत असतील परंतु यांना जोडणारा स्मार्ट मोबाईल आणि 4G नेटवर्क असल्यामुळे लॉंग डिस्टन्स जाणवत नाही. या लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आता सोशल मिडीया खूप मदत करीत आहे. सोशल मिडीयावर जुळली जाणारी जोडपी हि जास्त करून लॉंग डिस्टन्सवालीच असतात. 
               सगळ्या गोष्टी आहेत तशाच आहेत म्हणजे नवरा-बायको, प्रियकर-प्रेयसी,मित्र-मैत्रीण आणि त्यांच्यातील लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप. सगळे आहेत तसेच आहेत बदलला आहे तो त्यांच्यातील म्हणण्यापेक्षा त्यांच्या नात्यातील 'प्रामाणिकपणा', त्यांच्या आकलनानुसार त्यांची 'प्रेमाची व्याख्या', एकमेकांकडून असणाऱ्या 'अपेक्षा'. लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहे म्हणजे प्रेयसी किंवा प्रियकर तर रोज भेटणार नाही म्हणून रोज भेटणाऱ्या कोणासोबत तरी वेळ घालवू हि प्रेमी युगुलांमध्ये रुजत आणि महत्त्वाचे म्हणजे मुरत चाललेली भावना. लग्न करण्यासाठी एक मुलगी किंवा एक मुलगा फिक्स आहे ना मग त्याच्या नकळत इतरांसोबत नाते ठेवण्याची आवड. किती प्रेमप्रकरण एकावेळी सांभाळू शकतो याची लागलेली चुरस आणि शारीरिक सुख उपभोगण्याची वाढलेली मानसिकता या सगळ्या प्रकारांमुळे तरुणाईतले लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप टिकत नाही आणि टिकले तरी त्याला प्रेमाच्या पावित्र्याची सर येत नाही.
नवरा कामानिमित्त बाहेरगावी गेला तर जी बायको आपल्या नवऱ्याची त्याने पाठवलेल्या एका चिट्ठीची आणि त्याने केलेल्या एका फोनची आतुरतेने वाट बघत होती तीच बायको नवऱ्याच्या नकळत परपुरुषासोबत संबंध ठेऊ लागली आहे. हेच उदाहरण नवऱ्याचं देखील.
            मला असे वाटायचं कि लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप नाते खुलवते. आपल्या माणसाला भेटण्याची ओढ हि नकळत आपले मन त्याच्या विचारांनी घेरून टाकते. नेहमी त्याचाच विचार करणे तो काय करत असेल, कुठे असेल , माझी आठवण काढत असेल का , वर्षभरात त्याच्यामध्ये काय बदल झाले असतील , त्याची कोणासोबत मैत्री झाली असेल का ? तो मला भेटण्यासाठी किंवा मला पाहण्यासाठी काय करेल ? तो पण माझ्या इतकाच मला भेटायला आतुर असेल का असे एक ना हजार कुतूहलाचे प्रश्न यामध्ये सतावत असतात. मुळात प्रेम हि भावनाच पवित्र आणि निर्मळ असल्यामुळे ती सदैव आपल्या जोडीदाराच्याच भोवती फिरत असते.
           कारण जे पवित्र नसते ते बाकी काही असू शकते पण त्याला प्रेम नाही  म्हटले जाऊ शकत. कारण प्रेम हे फक्त आणि फक्त पवित्र असते. त्यामुळे लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप या संकल्पनेमध्ये प्रेमाचे पावित्र्य जपणे गरजेचे असते.      

- सोनाली चंद्रकांत बेटकर 

Comments

Popular posts from this blog

My Kind of CINEMA – Kuchh Bheege Alfaaz (2018)

शेवटची भेट

कारण आपल्यात सगळं असेल पण ते प्रेम नसेल....