देव नाही मानवच
देव नाही मानवच !
धुळ्यामध्ये रुग्णाचा प्राण वाचवण्यात अपयश आल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण करण्याची बातमी कानावर आली आणि विचारांचे चक्र सुरु झाले. हि बातमी शिळी होतंच होती तितक्यात माझ्या घराजवळ असणाऱ्या सायन हॉस्पिटलमध्ये देखील डॉक्टरांना मारहाण करण्यात आली आहे अशी बातमी टीव्हीवर दाखवण्यात आली. थांबलेल्या विचारांना पुन्हा गती मिळाली. एकच वाक्य तोंडी आले बिचारे डॉक्टर !
गमावलेला रुग्ण नक्कीच परत नाही येणार याच शोकांतिकेमुळे रुग्णांच्या नातेवाईकांना दुःख अनावर होऊन भावनेच्या भारत ते हेय सगळं डॉक्टरांमुळे झाले किंवा त्यांनी हलगर्जीपणा केला असा समज करून घेऊन त्यांच्या अब्रूची लख्तरं हि त्यांना मारहाण करून शिवीगाळ करून ते काम करत असलेल्या हॉस्पिटल बाहेर लटकवली जातात. या निषेधार्थ डॉक्टरांनी संप पुकारला तरी पुन्हा त्यांनाच दोष देण्यात येतो. हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांची चिकित्सा होत नसल्याने डॉक्टर आता दानव झाले आहेत असे प्रत्येकजण बोलत सुटलाय. कोर्टाने तर थेट भीती वाटत असेल तर घरी बसा असा काहीसा सल्ला डॉक्टरांना दिला आहे. डॉक्टारांवाचून रुग्णांचे हाल होत आहेत अनेकांना जीव देखील गमवावा लागला हे जितके खरे आहे तितकेच डॉक्टर म्हणून समाजामध्ये असलेली प्रतिष्ठा या मारहाणीमुळे संपुष्टात येत आहे हे देखील तितकेच खरे.
डॉक्टर हा देवाचे रूप घेऊन आलेला असतो असा प्रत्येक रुग्ण आणि त्याचे नातेवाईक रुग्ण बारा झाल्यानंतर बोलत असतात आणि याउलट काही वाईट झाले तर त्याच डॉक्टरला मारहाण केली जाते हा न्याय कोणता ? आज भारतामध्ये पत्रकारांवर , पोलिसांवर, नेत्यांवर आणि आता डॉक्टरांवर हल्ले होत चालले आहे अशा वेळी कोणत्या तरुणाला वाटेल कि मला पोलीस, पत्रकार किंवा डॉक्टर व्हायचे आहे .
आपल्या देशात प्रत्येकजण स्वतःच्या हक्कासाठी संप करीत सुटत असतो अगदी घरापासून पगारापर्यंत अशा वेळी डॉक्टरांच्या संपामुळे वैद्यकीय व्यवस्था भले विचलित झाली असेल पण स्वतःच्या सुरक्षेसाठी त्यांनी उचलेले संपाचे पाऊल नक्कीच योग्य आहे. शेवटी डॉक्टर जीव वाचवत असले तरी ते देव नाहीत मानव आहेत हे प्रत्येक रुग्णाच्या नातेवाईकाने आणि प्रत्येक मानवाने लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
Comments
Post a Comment