संदेसे आते है.....
शौर्याम दक्षम युधे बलिदान परमो धर्मा।।
प्रत्येक 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला
हमखास लागणारं गाणं. कधी कधी माझ्यासारखे लोक सहज म्हणून देखील हे गाण आपल्या
प्लेलिस्ट मध्ये ठेवतात आणि ऐकतात देखील. आज 15 ऑगस्ट म्हणून माझं देशप्रेम नेहमीपेक्षा
जरा जास्त नक्कीच उफाळून आलं म्हणून सकाळी उठल्यापासून देशाप्रति आपलं प्रेम
दाखवायची गाणी घरात लावलेली. सांगायला खरंच लाज वाटते पण शाळा संपल्यानंतर नीटसा
असा स्वातंत्र्य दिवस साजरा केलाच नाही पण हा देशप्रेम माझ्यात नक्कीच बऱ्यापैकी
आहे असं मला वाटंत. असो, विषय भरकटतोय, हा तर संदेसे आते है, हे गाणं ऐकलं की
नकळतपणे प्रत्येकाचं देशप्रेम, सैनिकांप्रति आपुलकी त्यांचा हेवा, कौतुक, मान,
सन्मान आणि ऊर भरून येण्याची भावना अशा सगळ्याच भावना एकत्र दाटून येतात. मला आठवतंय
ज्यावेळी मुंबईमध्ये डॉक्टरांना मारहाण झाली होती आणि ते संपावर गेले होते
त्यावेळी सैनिकांसोबत त्यांची तुलना केली जात होती की सैनिक आपलं काम सोडून कधी
संपावर गेले तर किंवा ते कधी काहीच मागणी करत नाही अँड ऑल असं बरंच काही. त्यावेळी
एक कमेंट मी वाचली होती की इतंक काय सैनिकांचं कौतुक करायचं, प्रत्येक जण आपापलं
काम करत असतात आणि त्यांनी ते करियर म्हणून निवडलं आहे त्यामुळे सैनिक सैनिक असं
आश्चर्य किंवा अभिमान वाटायची गरज नसावी. पण असं नाही मित्रा, प्रश्न जर करियर
निवडीचाच असेल ना तर तो सैनिक न होता डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, क्लार्क, बँकर
काहीही होऊ शकला असता कारण त्यांची निवड कागदावर घेतल्या जाणाऱ्या परिक्षेतूनही
होते ना? परंतु ते पैसे कमवायची सर्व संधी देणारे करियर सोडून आपल्या देशाचे रक्षण करणं पसंत
करतात. मी माझे आई-वडील 5 दिवस गावी गेले मला सोडून आणि 6व्या दिवशी आले नाहीतर
कासावीस होते, त्यांच्याशिवाय चुकल्या-चुकल्यासारखे वाटते आणि आपले सैनिक आपल्या
कुटुंबापासून, मित्रांपासून, ऐशो-आरामापासून कित्येक मैल दूर आपल्या जीवाची बाजी
लावत असतात. उद्याचा दिवस तर सोडा 1 तासानंतर तरी मी जिवंत राहीन का याची ते खात्री
देऊ शकत नाही. आपला जीव तळहातावर घेऊन फिरत असतात. असं करियर निवडायला खरी हिंमत
लागते. आज बॉर्डरवर गेलेला कोणाचा तरी मुलगा, भाऊ, नवरा, बाप कधी परत येईल, परत
येईल की नाही याची पण खात्री नसते अशा वातावरणात सैनिक आणि त्यांचे कुटुंब वावरत
असतं आणि जगत असतं. शहीद झालेल्या कुटुंबात आपला मुलगा, भाऊ किंवा नवरा शहीद झाला
म्हणून त्याच्या दु:खाचं सुतक न करता आई आपल्या दुसऱ्या मुलाला किंवा बायको आपल्या
एकुलत्या एक मुलाला वडिलांसारखीच देशाची सेवा करायला सैन्यात पाठवते. याला म्हणतात
खरं देशप्रेम आणि खरी हिंमत.
संदेसे आते है या
गाण्यामध्ये त्याच सैनिकाच्या कुटुंबाची तळमळ, आपल्या मुलाची किंवा नवऱ्याची
चिंता, त्याला भेटण्याची आस, सैनिकाचा आत्मविश्वास, त्याला त्याच्या कुटुंबाची
असलेली काळजी या सर्व गोष्टींचा भास होतो. हे गाणं ऐकताना डोळ्यात आलेलं पाणी
देशप्रेमापेक्षा सैनिकांच्या सुरक्षेसाठी जास्त होतं असं मी म्हणू शकते. मला माहीत
आहे माझ्यामध्ये आपल्या सैनिकांइतकी हिंमत नक्कीच नाही पण जेव्हापासून देश म्हणजे
नक्की काय हे समजू लागलंय तेव्हा पासून देशाचं नेहमी चांगलंच व्हावं, देशाचं नाव
सगळ्या चांगल्या गोष्टीत पहिल्या स्थानी असावं, देशातला गरीबातला गरीब देखील
रात्री झोपताना उपाशी पोटी आणि असमाधानी झोपू नये असंच वाटतं आणि देशाच्या भल्यासाठी
सर्वांना असंच वाटावं आणि शेवटच्या ओळीसारंख में वापस आऊंगा म्हणतं प्रत्येक सैनिक
सुखरूप आपल्या घरी परतावा अशीच या स्वातंत्र्य दिनी अपेक्षा!
आपल्या देशाच्या
सुरक्षेसाठी स्वत:च्या प्राणांची बाजी लावणाऱ्या शहीद वीर जवानांना माझा मानाचा
मुजरा !!!
स्वातंत्र्य दिन चिरायू
होवो.
जय हिंद, जय भारत

Comments
Post a Comment